World Test Championship schedule | क्रिकेटप्रेमींना पुन्हा एकदा कसोटी सामन्यांचा थरार अनुभवायला मिळणार आहे. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप (WTC) 2025-27 च्या पर्वाची अधिकृत घोषणा करण्यात आली असून, यंदाच्या स्पर्धेचं वेळापत्रक देखील जाहीर झालं आहे. एकूण ९ संघांचा सहभाग असलेल्या या पर्वात ७१ कसोटी सामने खेळवले जाणार आहेत. यामध्ये भारताचे १८ सामने निश्चित झाले असून, भारतीय संघाचा पहिला सामना २० जूनपासून इंग्लंडविरुद्ध लीड्समध्ये होणार आहे. World Test Championship schedule
दक्षिण आफ्रिकेने नुकत्याच पार पडलेल्या तिसऱ्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमध्ये जेतेपद मिळवल्यानंतर, ICC ने नव्या पर्वाची तयारी सुरू केली आहे. WTC चं हे चौथं पर्व असून, १७ जून २०२५ पासून श्रीलंका आणि बांगलादेश यांच्यातील गॉल कसोटीने त्याची सुरुवात होणार आहे.
भारतीय संघ कधी कुणाविरुद्ध खेळणार?
BCCI कडून मिळालेल्या माहितीनुसार, टीम इंडियाने यंदा १८ कसोटी सामने खेळायचे असून, त्यापैकी पाच सामने इंग्लंडविरुद्ध इंग्लंडमध्ये होतील. उर्वरित सामने वेस्ट इंडिज, दक्षिण आफ्रिका, ऑस्ट्रेलिया, श्रीलंका आणि न्यूझीलंडविरुद्ध आहेत. भारतात तीन मालिका होतील वेस्ट इंडिजविरुद्ध २ सामने, दक्षिण आफ्रिकेविरुद्ध २ सामने आणि ऑस्ट्रेलियाविरुद्ध ५ सामने. तर श्रीलंका आणि न्यूझीलंडविरुद्धचे २-२ सामने त्यांच्या देशात होणार आहेत.
यांदा भारतीय कसोटी संघाचं नेतृत्व शुबमन गिलकडे देण्यात आलं आहे. एका नव्या युवा चेहऱ्याकडे कसोटीतील जबाबदारी सोपवली गेल्यामुळे यंदा भारताचं प्रदर्शन कसं असेल याकडे सर्वांचं लक्ष लागून राहणार आहे.
WTC 2025-27 मध्ये संघांची सामने संख्या:
संघ सामने
ऑस्ट्रेलिया 22
इंग्लंड 21
भारत 18
न्यूझीलंड 16
वेस्ट इंडिज 14
दक्षिण आफ्रिका 14
पाकिस्तान 13
श्रीलंका 12
बांगलादेश 12
टीम इंडियाचं WTC वेळापत्रक – दोन वर्षात होणाऱ्या कसोटी मालिका
इंग्लंडविरुद्ध – ५ सामने (२० जूनपासून, इंग्लंडमध्ये)
ऑस्ट्रेलियाविरुद्ध – ५ सामने (भारतामध्ये)
वेस्ट इंडिजविरुद्ध – २ सामने (भारतामध्ये)
दक्षिण आफ्रिकेविरुद्ध – २ सामने (भारतामध्ये)
श्रीलंकेविरुद्ध – २ सामने (श्रीलंकेत)
न्यूझीलंडविरुद्ध – २ सामने (न्यूझीलंडमध्ये)
मागील पर्वात भारताने ऑस्ट्रेलिया व न्यूझीलंडविरुद्धची मालिका गमावल्यामुळे WTC फायनलपासून दूर राहावं लागलं होतं. यंदा जर टीम इंडियाला अंतिम फेरी गाठायची असेल, तर इंग्लंड आणि ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकांमध्ये विजय मिळवणं अत्यावश्यक ठरणार आहे. कारण या दोन संघांवर मात न करता भारतासाठी फायनल गाठणं कठीण होऊ शकतं.
दरम्यान, दक्षिण आफ्रिकन संघ यंदा पाकिस्तानमध्ये कसोटी मालिका खेळणार असून, सप्टेंबर २०२६ मध्ये दक्षिण आफ्रिका आणि ऑस्ट्रेलियामध्ये तीन कसोटी सामन्यांची मालिका पार पडणार आहे.