India vs England : शुभमन गिलच्या नेतृत्वाखाली भारताची कसोटी संघ आता इंग्लंडमध्ये ५ सामन्यांच्या महत्त्वपूर्ण कसोटी मालिकेसाठी सज्ज झाला आहे. रोहित शर्माच्या निवृत्तीनंतर नव्या नेतृत्वाखाली ही पहिली मोठी चाचणी असणार आहे. संपूर्ण संघ आधीच इंग्लंडमध्ये पोहोचून कसून सराव करत आहे. मात्र अशातच काही दिवसांपूर्वी भारतीय संघाला मोठा धक्का बसला होता, जेव्हा संघाचे मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर यांना अचानक भारतात परत यावं लागलं. त्यांच्या आईला हृदयविकाराचा झटका आल्यामुळे त्यांना तात्काळ दिल्लीतील गंगाराम रुग्णालयात भरती करण्यात आलं होतं आणि गंभीर यांनी कुटुंबासाठी तात्काळ इंग्लंडहून परतीचा मार्ग धरला होता. India vs England
या घडामोडींमुळे इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या कसोटीत ते संघासोबत असतील की नाही यावर प्रश्नचिन्ह होतं. पण आता त्यांच्या चाहत्यांसाठी आणि संघासाठी एक दिलासादायक बातमी समोर आली आहे. गंभीर यांच्या आईच्या तब्येतीत आता सुधारणा झाली असून ते मंगळवारी पुन्हा एकदा टीम इंडियात सहभागी होणार आहेत. त्यामुळे २० जूनपासून सुरू होणाऱ्या इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेला ते वेळेवर उपस्थित राहणार आहेत.
त्यांच्या अनुपस्थितीत भारताच्या सराव शिबिरात फलंदाजी प्रशिक्षक सीतांशु कोटक, गोलंदाजी प्रशिक्षक मोर्ने मोर्कल, सहाय्यक प्रशिक्षक रयान टेन डोशेट आणि क्षेत्ररक्षण प्रशिक्षक टी दिलीप यांनी संघाचं मार्गदर्शन केलं. मात्र आता मुख्य प्रशिक्षक परतल्याने संघाला पुन्हा एकदा संपूर्ण नेतृत्व मिळणार आहे. इंग्लंडविरुद्धची कसोटी मालिका ही भारतासाठी फारच महत्त्वाची मानली जात आहे.
२० ते २४ जूनदरम्यान लीड्स येथे पहिला सामना रंगणार असून, पुढे २ ते ६ जुलैला दुसरी कसोटी बर्मिंघममध्ये, १० ते १४ जुलैला लॉर्ड्सवर तिसरी, २७ ते ३१ जुलै दरम्यान मँचेस्टरमध्ये चौथी आणि अखेरची कसोटी ३१ ऑगस्ट ते ४ सप्टेंबर दरम्यान केनिंग्टन ओव्हलवर होणार आहे. त्यामुळे या कसोटी मालिकेवर संपूर्ण देशाचं लक्ष लागून राहणार आहे. गंभीर यांच्या पुनरागमनामुळे खेळाडूंना मानसिक आधार मिळणार असून संघात नवा आत्मविश्वास संचारेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.